Type Here to Get Search Results !

गणवेशात नसणे पोलिसांनाही पडले महागात; नागरिकांचा पोलिसासह खबऱ्यावर जीवघेणा हल्ला

१५० जणांवर गुन्हा दाखल, वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट


पुणे, दि. २४ (चेकमेट टाईम्स): गणवेशात नसणे पोलिसांना चांगलेच महागात पडले असून, वेगळाच संशय येऊन नागरिकांनी पोलिसासह खबऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना वारजे माळवाडी मधील नवीन म्हाडा कॉलनी मध्ये घडली आहे. गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी तपासासाठी वारजेतील म्हाडा कॉलनी येथे तपासासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सुमारे दीडशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा (युनिट १ )वाहनचोरी विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलीस शिपाई श्रीकांत दगडे व ऋषिकेश कोळप हे वारजे परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना येथील म्हाडा कॉलनी परिसरात एका खबऱ्यामार्फत अभिजीत खंडागळे (रा.चौथा मजला, म्हाडा कॉलनी, आरएमडी कॉलेजजवळ, वारजे माळवाडी, पुणे) याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल व काडतुसे असून त्याचा वापर करून तो एक दोन दिवसात आपल्या साथीदारांसह परिसरात जबरी चोरी करणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती.

याबाबत आपल्या वरिष्ठांना कळवून हे दोघे पोलीस कर्मचारी म्हाडा कॉलनी परिसरात बिल्डिंग क्रमांक 2 येथे मंगळवारी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास गेले होते. यावेळी संशयित अभिजीत खंडागळे राहत असलेल्या चौथ्या मजल्यावर जिन्याद्वारे पोलीस कर्मचारी वर जात असताना खाली काही तरुण मुले त्यांच्याकडे संशयाने पाहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलीस कर्मचारी हे साध्या वेशात असल्यामुळे त्यांना ते पोलीस आहेत असे वाटले नाही. पोलिसांबरोबर असलेला खबऱ्या कायम चुकीची माहिती देऊन कॉलनीतील रहिवाशांना नाहक त्रास देतो असा समज करून काही लोकांनी त्यांच्याशी बाचाबाची सुरू केली. त्यांच्यात वाद वाढत जाऊन सर्वांनी खबऱ्या आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांवर बांबू, सिमेंट ब्लॉक, स्टंप इत्यादी द्वारे हल्ला करून मारहाण केली. त्यात डोक्यात ब्लॉक लागल्याने खबऱ्या गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

यावेळी पोलिसांनी आम्ही पोलिस असून सरकारी कामात तुम्ही अडथळा आणू नका असे त्यांना वारंवार विनवणी करून देखील आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवून मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे पोलिसांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले. यावेळी हल्ला करणाऱ्या सुमारे दीडशेपेक्षा जास्त आरोपींपैकी सत्तावीस आरोपींची ओळख पटली असून इतरांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. वारजे पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक (गुन्हे) अमृत मराठे अधिक तपास करत आहेत.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.