Type Here to Get Search Results !

वारजे कर्वेनगर मध्ये अनधिकृत बांधकाम विभागाची गरिबांवर कारवाई; धनदांडग्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष्य

 


पुणे, दि. 25 (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने वारजे कर्वेनगर मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात अनधिकृतरीत्या बांधलेल्या छोट्या टपऱ्या, दुकानांवर कारवाईचा बडगा उगारत काही चौरसफूट क्षेत्रफळ जागा मोकळी केली. मात्र त्याचवेळी त्याच वारजे कर्वेनगर भागात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक इमारतींची अनधिकृत बांधकामे झाली आहेत आणि अनेक अनधिकृत बांधकामे सुरु देखील असून, त्याकडे मात्र सोयस्कररित्या डोळेझाक करण्यात आल्याने पालिकेच्या या कारवाईकडे संशयाने पाहिले जात आहे.

पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपअभियंता देवेंद्र पात्रे, कनिष्ठ अभियंता विठ्ठल मुळे, सतीश शिंदे, सचिन जावळकर, संग्राम पाटील यांच्या पथकाने आंबेडकर चौकातून तिरुपती नगरकडे जाणाऱ्या तीव्र उताराच्या रस्त्याच्याकडेला ३ हजार चौरसफूट अनधिकृतरीत्या बांधलेल्या टपऱ्या आणि पत्र्याच्या दुकानांवर २ जेसीबी, २ गॅस कटर, १० बिगारी आणि जवळपास ३५ ते ४० पोलिसांच्या बंदोबस्तात सदरील कारवाई केली.

दरम्यान या टपऱ्या आणि दुकानांना इतर अनधिकृत व्यावसायिक बहुमजली बांधकामांप्रमाणे २०१९ पासून नोटीसा देण्यात येत होत्या, मात्र प्रत्यक्षात कारवाई होत नव्हती. मात्र काल अचानक फासे फिरले आणि नोटीसा दिल्यानंतर २४ तासांच्या आत आज शुक्रवार दि.२५ जून २०२१ प्रत्यक्षात मोठा फौजफाटा घेऊन कारवाई देखील करण्यात आली. त्यामुळे वारजे आणि कर्वेनगर भागात शेकडो अनधिकृत बांधकामे झाली आणि सुरु आहेत, असे असताना अगोदरच लॉकडाऊनमुळे छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडलेले दिसत असूनही, ही कारवाई झाल्याने परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. त्याचवेळी अनेक वर्षांपासूनचा येथील अतिक्रमण निर्मूलनाचा प्रश्न सुटल्याने अडलेले रस्तारुंदीकरण पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होईल, अशी भाभडी अपेक्षा देखील नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या कारवाईमागे नेमके गणित काय असा प्रश्न उपस्थित होत असून, पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याचे स्पष्टीकरण देणे टाळले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.