Type Here to Get Search Results !

आमच्या समाविष्ठ गावांचा एक प्रभाग करा; शिवणे – उत्तमनगर - कोंढवे धावडे - कोपरे ग्रामस्थांची मागणी

 

पुणे, दि.१९ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. पुढील काही दिवसांमध्ये त्या जाहीर होतील. तत्पूर्वी प्रभाग रचना जाहीर होण्याकडे सर्वच इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागलेले असताना, प्रभाग कसे तोडले जात आहेत, कसे जोडले जात आहेत, याच्या वावड्या उठत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवणे – उत्तमनगर - न्यू कोपरे - कोंढवे धावडे या नव्याने समाविष्ठ झालेल्या चारही गावांचा मिळून एक प्रभाग करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी एकमुखाने केली आहे. या चारही गावांमधील सामाजिक, सर्वपक्षीय राजकीय, कला, क्रीडा, उद्योग क्षेत्रातील मंडळींचा मिळून “वैचारीक रुद्र कट्टा”चे उद्घाटन आज रविवारी सकाळी मोठया उत्साहात पार पडले. यावेळी झालेल्या अनेक विषयांवरील चर्चांमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीवर चर्चा झाली.

 

शिवणे – उत्तमनगर - न्यू कोपरे - कोंढवे धावडे या नव्याने समाविष्ठ झालेल्या चारही गावांमधील प्रमुख माजी उपसभापती शेखर दांगट पाटील, न्यू कोपरे’चे माजी सरपंच विजय गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, उत्तमनगरचे माजी सरपंच सुभाष नाणेकर, राष्ट्रवादीचे खडकवासला विधानसभा ग्रामीण अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, उद्योजक तुकाराम इंगळे, अरुण दांगट, मारुती किंडरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सारंग राडकर, अमोल कारले, अतुल धावडे, भगवान गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी त्रिंबक मोकाशी आणि प्रविण दांगट यांनी “वैचारीक रुद्र कट्टा” स्थापन करण्याचे उद्दीष्ट सांगत, शहरातील इतर कट्ट्याप्रमाणे हा “वैचारीक रुद्र कट्टा” देखील या भागाच्या विकासासाठी राजकीय जोडे बाजूला ठेऊन काम करेल असा विश्वास व्यक्त केला गेला. आजच्या पहिल्या दिवशी ‘ या समाविष्ठ चारही गावातील प्रॉपट्री टॅक्स’, ‘एनडीए सिमेलगत शंभर मीटर बांधकाम नियमावलीत शिथीलता आणण्यासाठी एनडीए व्यवस्थापनाशी बैठक करणे’ आणि सर्वात महत्वाचा आणि वातावरण तापवत असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका आणि त्यातील प्रभाग रचनेवर मोठी चर्चा झाली.

 

यावेळी चारही गावांच्या ग्रामस्थांनी मिळून “या चारही गावांचा मिळून एक प्रभाग झाल्यास, समाविष्ठ गावांचा एकसारखा विकास होईल” अशी भूमिका व्यक्त केली. सद्यस्थितीला प्रभाग रचना अंतिम झालेली नाही. मात्र ही चार गावे तोडली गेल्यास, चारही गावे मिळून निवडणूक आयोगाला निवेदन देतील, आक्षेप घेतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याबाबत चर्चा करताना या चार गावांपैकी दोन गावे वारजे माळवाडी आणि दोन गावे वारजे रामनगर भागाला जोडली जाणार असल्याच्या वावड्या उठत असल्यावर चर्चा झाली. त्या अधिकृत नसल्या, निवडणूक आयोगाने प्रभाग अधिकृतपणे जाहीर केलेला नसला तरी, पुणे महानगरपालिकेतील विद्यमान अनुभवी लोकांकडून यावर चर्चा होत असल्याने ग्रामस्थांमध्ये साहजिकच चर्चा सुरु झाली आहे.

 

यावर मुख्यत: आक्षेप घेताना चर्चा झालेल्या मुद्यात, जर पुणे महानगरपालिकेच्या जुन्या हद्दीतील वारजे माळवाडीला अथवा वारजे रामनगरला, नव्याने समाविष्ठ गावांमधील निरनिराळे भाग जोडले गेल्यास, विकासकामांचे विभाजन होईल. जुने नगरसेवक अनुभवी असल्याने ते जुन्या भागात निधी वळवतील आणि परिणामी समाविष्ठ नवीन गावांच्या विकासाला निधी न मिळाल्यास या गावांचा विकास होण्याऐवजी, येथील विकासाची कामे रखडण्याची भिती व्यक्त केली गेली.

 

त्याचबरोबर २०११ च्या जनगणनेनुसार या भागातील लोकसंख्या ही ५१ हजार होत असल्याने, या गावांचा नियमानुसार ३ नगरसेवकांचा १ प्रभाग होत असल्याचा दावा केला गेला. त्यामुळे या गावांची नावे जरी वेगवेगळी वाटत असली तरी या गावांची एकरूपता वेगळी असून, गावांची विभागणी न करता चारही गावांचा मिळून एक प्रभाग करण्याची आग्रही मागणी पुढे आली आहे, किंबहुना या चार गावांचा मिळून एक प्रभाग होण्यासाठी या चारही गावांच्या ग्रामस्थांनी मिळून वज्रमुठ आवळली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या “वैचारिक रुद्र कट्टा”सह सर्वांचे लक्ष निवडणूक आयोगाच्या प्रभाग रचनेकडे लागले असून, या गावांचे विभाजन झाल्यास त्यावर सरळ हरकती नोंदवल्या जातील याबाबत शंका नाही. त्याचबरोबर प्रसंगी यावर न्यायालयाचे दरवाजे देखील वाजवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये या चार गावांचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजणार असे चित्र निर्माण झाले आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.