Type Here to Get Search Results !

नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांचा पुण्यातील तो कार्यक्रम तोंडावर आपटला; जनाधार ढासळला ?

 

nitin gadkari, devendra fadnavis, dilip valse patil, chandrakant patil programme in karvenagar pune

पुणे, दि. 23 सप्टेंबर 2024 (चेकमेट टाईम्स): नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांचा पुण्यातील कर्वेनगर मध्ये घेतलेला तो कार्यक्रम तोंडावर आपटल्याचे समोर आले आहे. मात्र त्याचवेळी तो आपटला का मुद्दाम आपटवला याच्या उलट सुलट चर्चांना उधान आले आहे. तर भाजपाचा खरंच जनाधार ढासळतोय का गटातटाच्या राजकरणात ढासळवला जातोय? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतोय. बारामती लोकसभा मतदार संघातील खडकवासला विधानसभा आणि पुरंदर विधानसभा मतदार संघातील विकासकामांचे भूमिपूजन, पुणे लोकसभा मतदार संघात असलेल्या कोथरूड विधानसभा मतदार संघातील कर्वेनगर मध्ये नुकताच घेण्यात आला. तो कोणाच्या इच्छेखातर घेण्यात आला यावरून आता पदाधिकारी कार्यकर्ते आतून बोलू लागले आहेत.

 


हा तब्बल ४०० कोटीच्या विकासकामांचे भूमीपूजन सोहळा होता. मात्र त्याला २०० पदाधिकारी-कार्यकर्ते देखील उपस्थित नव्हते. नशीब ते आळंदीची भजनी मंडळे गोळा करून आणली होती, अन्यथा मंडप दहा टक्के देखील भरला नसता अशा प्रकारच्या भावना कार्यक्रमानंतर भाजपाच्याच वरिष्ठांनी व्हिसी मध्ये बोलून, पदाधिकारी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी ही केवळ पक्षासाठी नव्हे, तर आपल्या सर्वांसाठी लाजीरवाणी बाब असल्याचेही भाजपाच्या वरिष्ठांनी जाहीरपणे बोलू दाखवले. तर पुढच्या काही दिवसांत असलेल्या मोदींच्या कार्यक्रमाला गर्दी आणली नाहीत तर वेगळा विचार करावा लागेल अशी तंबीच पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिली गेली असल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भाजपाच्या अनेक जुन्या आणि मातब्बर पदाधिकारी कार्यकर्त्यांना निमंत्रणेच नव्हती अशी धक्कादायक माहितीही समोर आली आहे. पुण्यातील भाजपा आता विकेंद्रित झाली असल्याने हा प्रकार झाला असल्याचे भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते बोलू लागले आहेत.

 


नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील या मंत्र्यांसह भाजपचे अपवाद वगळता सर्व आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, सभागृहात मांडलेल्या खुर्व्यापैकी निम्म्याही खुर्च्या भरल्या नव्हत्या. त्यातही भरलेल्या खुर्च्यांमध्ये वारकऱ्यांचीच गर्दी अधिक होती. या गर्दीवरून भाजपा शहर पातळीवर झालेल्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच झापले. सर्वांना सांगूनही पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक का आले नाहीत? याचा अहवाल नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना मागितला. त्यामुळे कार्यक्रम संपल्यापासून भाजपमध्ये चांगलेच तु-तू मैं-में... असे वातावरण सुरू झाले आहे.

 


नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी केलेले “पंतप्रधान पदाच्या ऑफर बाबतचे वक्तव्य” आणि “पुण्याचा कारभारी कोण?” या दोन कारणांनी काही भाजपाच्याच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी असहकाराची भूमिका राबवल्याचे काहीजण खाजगीत बोलू लागले आहेत. खडकवासला विधानसभा मतदार संघातील अनेकजण तर फक्त चमकोगिरी करायला कार्यक्रमाला आले होते. त्यांचा अतिआत्मविश्वास मागच्यावेळी त्यांना नडला होता आणि आताही नडणार आहे. कोथरूड आणि शहराच्या काही पदाधिकाऱ्यांनी ताकद लावली नसती तर कार्यक्रमाचा पक्का बोजवारा उडाला असता अशा प्रकारची विधाने शहर भाजपा मधील पदाधिकारी कार्यकर्ते करत होते. काही जणांनी कार्यक्रमाचे श्रेय लाटण्यासाठी मोठी धडपड चालवली होती, त्यांना तोंडावर पाडण्यासाठी काहींनी “गांधीगिरी” केल्याचेही समजते. एकूणच हा कार्यक्रम चांगलाच आपटला हे सत्य भाजपाच्या वरिष्ठांनी कबुल केले असून, आता मोदींचा कार्यक्रम पडू नये यासाठी त्यांचे मोठे प्रयत्न सुरु झाले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.