Type Here to Get Search Results !

दादा, पुण्यातील विक्रम – वेताळ खेळ थांबवा !; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आम आदमी पार्टीचे खुले पत्र

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

aap letter to chandrakant patil - checkmate times

पुणे, दि. 24 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): यापूर्वी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना “कोथरूडच्या विकासावर खुल्या चर्चेला या” असे आवाहन देणाऱ्या आम आदमी पार्टीच्या डॉ अभिजित मोरे (Dr. Abhijit More) यांनी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना खुले पत्र लिहिले असून, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (Pune Municipal Commissioner Vikram Kumar) यांना त्यामध्ये “विक्रम वेताळ” म्हटले आहे. त्यामुळे या पत्राची कोथरूड मध्ये चर्चा सुरु झाली आहे. पाहूयात काय म्हटले आहे पत्रात जसेच्या तसे... (Aam Aadmi Party letter to Chnadrakant Patil)

माननीय  चंद्रकांत दादा,

पुण्यात चाललेला 'विक्रम- वेताळ' हा खेळ बघितल्यावर कोथरुड (Kothrud), बावधन (Bavdhan), पाषाण (Pashan), बाणेर (Baner) येथील सुज्ञ रहिवाशांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, पुण्याचे पालकमंत्री व कोथरुड विधानसभेचे आमदार असणाऱ्या चंद्रकांत दादांचे खरेच कोथरुडवर प्रेम नाही का? दादा, तुम्ही कोथरूडचं वैभव का नष्ट करत आहात? खरं म्हणजे ऐनवेळी कोल्हापुरातून कोथरुडमध्ये येऊन स्थानिक उमेदवारांना बाजूला सारुन भाजपने तुमची उमेदवारी घोषित केली आणि त्याला कोथरुडमधील जनतेने प्रतिसाद देखील दिला. असे असून सुद्धा तुम्ही कोथरुडकरांवर का सूड उगवत आहात? कोथरुडकरांच्या प्रेमाची भरपाई तुम्ही अशी कराल याची अपेक्षा कोथरुडवासियांना नव्हती.

ज्याला कोथरुडचं वैभव आणि पुणे शहराचं फुफ्फुस समजलं जातं त्या शांत, निसर्गरम्य वेताळ टेकडीला गिळंकृत करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार हे सरसावलेले आहेत. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार हे स्वतःला 'विक्रम- वेताळ' या गोष्टीतील राजा विक्रम समजत आहेत आणि स्वतः सोबत वेताळ टेकडी फोडून घेऊन जायचा दररोज प्रयत्न करत आहेत. गोष्टीतील राजा विक्रम हा जरी एक प्रामाणिक राजा होता तरी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार हे प्रामाणिक प्रशासक आहेत असं म्हणता येणार नाही.

वेताळ टेकडी फोडून त्या ठिकाणी रस्ते, बोगदा व तथाकथित इतर कामे करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने त्यांनी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. महानगरपालिकेत, राज्यात व केंद्रात भारतीय जनता पार्टीचं ट्रिपल इंजिनचे सरकार असताना  कोथरुडचा श्वास असलेल्या व पुण्याचे फुफ्फुस असलेल्या वेताळ टेकडीचा घास घेतला जात असेल तर सर्वसामान्य कोथरुडकर जनतेने तुम्हाला निवडून दिल्याचा फायदा काय?

दादा, विकास कामांना विरोध नाही. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्ते बनवायला पाहिजेत. ते जरुर बनवा... परंतु पुणे शहरातील ऑक्सिजन निर्मितीचे केंद्र असलेल्या या टेकड्या फोडून, निसर्ग नष्ट करून रस्ते बनवणे, बोगदे बनवणे हे सामान्य पुणेकरांना मान्य नाही. तुमचा पक्ष कितीही पॉवरफुल पक्ष असला तरी तुम्ही केवळ रस्ते बनवू शकाल... पण तुम्ही शहराच्या मधोमध पुन्हा टेकड्या आणि निसर्ग बनवू शकणार नाही. त्याला ब्रह्मदेवच लागेल ! ... आणि तुमचा पक्ष काही ब्रह्मदेव नाही.

तेव्हा एक साधी विनंती आहे की, किमान भस्मासुर तरी बनू नका. जे बनवता येत नाही, ते नष्ट करु नका. टेकड्या फोडून बालभारती - पौड रोड करण्याऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे, रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे, सिग्नलचे योग्य सिनक्रोनायझेशन करणे यासारखे उपाय करायला पाहिजे अशी आग्रही विनंती आहे. गेली पाच वर्षे पुणे मनपात सत्ता असून देखील भाजपला पी.एम.पी.एम.एल. ही सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुधारायला जमली नाही. टक्केवारी- टेंडरबाजी याकडे तुमच्या पक्षातील नेत्यांनी कमी लक्ष दिले असते तर ते कदाचित होऊ शकले असते.


रस्ते व रस्त्यावरील खड्डे, पावसाळा आल्यावर रस्त्यावर साचणारे पाणी याबद्दल बोलायलाच नको एवढी वाईट स्थिती आहे. अहो दादा, पुणे मनपाच्या स्थापत्य विभागात 42 बोगस इंजिनियर अधिकारी आहेत. गेले दीड वर्षे याबाबत आम आदमी पार्टी आवाज उठवत आहे. पण तुमच्या विक्रम कुमारांनी या 42 बोगस अभियंत्यांना अभय दिले आहे. कोणतीही डिग्री नसताना भाजपची सत्ता असताना 42 मुन्नाभाई इंजिनीयर हे मनपातील अधिकारी बनले आहेत. बालभारती- पौड रोडचे डिझाईन हेच बोगस इंजिनीयर तपासणार आहेत का ? पुण्यात कुठेही, कधीही, कसेही  फ्लायओव्हर बांधले जातात आणि अचानक पाडलेही जातात. पुणेकर नागरिकांना अशा प्रकाराचा अक्षरशः वीट आलेला आहे.

दादा, दिवसेंदिवस पुणे शहरातील एयर क्वालिटी इंडेक्स हा बिघडत चाललेला आहे. पुणे शहरातील प्रदूषित हवेचे प्रमाण वाढत चाललेले  आहे. पुणे शहराला जर दिल्लीसारखे गॅस चेंबर बनू द्यायचे नसेल तर शहराची ही फुफ्फुसे म्हणजे निसर्गाने बहरलेल्या टेकड्या वाचल्या पाहिजेत आणि या टेकड्या वाचवण्यासाठी केवळ एकच उपाय आहे- तो म्हणजे या टेकड्यांना अजिबात हात न लावणे. Hands Off... "तुम्हाला जो काही विकास करायचा आहे, तो टेकड्या सोडून करा" एवढे नम्र आवाहन आहे.

तुम्हाला अरब, उंट व तंबूची गोष्ट माहित असेलच. एकदा का या नवनवीन रस्त्यांचा उंट वेताळ टेकडी नावाच्या तंबूत शिरला की हळूहळू सगळा निसर्ग बाहेर फेकला जाईल अशी भिती अनेक सुज्ञ, जागरुक नागरिकांना वाटत आहे. ती अनाठायी आहे असे म्हणता येणार नाही.

"वेताळ टेकडी फोडणे हा विकास नाही, तर विनाश आहे" एवढं तुमच्या सरकारला व आयुक्त विक्रम कुमार यांना तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी म्हणून सांगावं अशी विनंती आहे. दादा, पुण्यात चाललेला विक्रम- वेताळ हा खेळ तात्काळ थांबवावा... अन्यथा हे वेताळ टेकडी नावाचं भूत भारतीय जनता पक्षाच्या डोक्यावर कधी बसेल हे कळणार देखील नाही.

हेही वाचा - वारजे आंबेडकर चौक ते महात्मा सोसायटी रस्त्यासह कोथरूड मधील रस्त्यांची कामे वेगाने करा; पालकमंत्र्यांचे आदेश

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.