Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha
पुणे, दि. १२
जून २०२५ (Checkmate Times): वारजे माळवाडी मधील दर्या बार समोरील मैदानात दारू पिणाऱ्यांमध्ये
होणाऱ्या भांडणांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. यापूर्वी अनेकदा खुनी हल्ले
झालेल्या या बार समोरील मैदानात पुन्हा एकदा एका तरुणाच्या डोक्यात आणि तोंडावर
बिअरच्या बाटल्या फोडून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर
आली आहे. त्यामुळे या मैदानात खुलेआम दारू पिणारे गस्तीवरील पोलिसांना दिसत नाहीत का?
त्यांना अटकाव घालण्यात वारजे पोलिसांना अपयश का येते आहे? असे एक ना अनेक प्रश्न
या निमित्ताने समोर येत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी येथील दर्या बारसमोरील
मोकळया जागेत सोमवार दि.९ जून २०२५ रात्री साडेबाराच्या सुमारास सदरील घटना घडली.
यातील फिर्यादी आणि त्याचे मित्र दर्या बारसमोरील मोकळया जागेतील भिंतीलगत लघुशंका
करण्यासाठी गेले होते. यावेळी भिंतीच्या पलिकडे आरोपी दारु पित बसले होते. त्यांनी
फिर्यादींना “तुम्ही इथे आमचे समोर गोंधळ का करताय, तुम्हाला लय मस्ती आली का”, असे म्हणाले. त्यावर त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे
पर्यावसान मारामारीत झाले. यावेळी दारू पीत बसलेल्यांपैकी एकाने आपल्या हातातील
बिअरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात कपाळावर मारली, तर दुसऱ्याने तोंडावर, ओठावर
बाटली मारून फिर्यादीवर जीवघेणा हल्ला केला. त्याचबरोबर लाथाबुक्क्यांनी मारहाण
करत, लोखंडी हत्यार हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. अचानक झालेल्या या
घटनेमुळे या भागात दारू पीत बसलेल्यांची एकच पळापळ झाली. येथे दारू प्यायला
बसणाऱ्यांत अनेकजण गुन्हेगारी क्षेत्रातील असतात, त्यामुळे त्यांना कोणी काही बोलत
नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
याबाबत धनंजय एकनाथ गुरव (वय २६, रा. गोकुळनगर पठार, वारजे माळवाडी, पुणे) यांनी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली
असून, पोलिसांनी हल्लेखोर आदित्य अशोक मारणे (वय ३०, रा. श्रीराम कृपा अपार्टमेंट, दत्तनगर, वारजे, पुणे) आणि विकी गेंदालाल करंजाळे (वय ३०, रा. सदगुरु प्रेस्टीज, उत्तमनगर, पुणे) यांना अटक केली आहे. तर त्यांचा एक
साथीदार फरार झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगदाळे पुढील तपास करत आहेत.
वारजे माळवाडी मध्ये अनेक ठिकाणी ओपन बार; त्यांना कोण रोखणार ?
वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक ठिकाणी म्कल्या जागांमध्ये
दारू पिणाऱ्यांचे ओपन बार तयार झाले असून, त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे.
त्यांना कोणी काही बोलायला गेले कि भांडणे होतात, प्रसंगी दुचाकींच्या डिक्कीत
ठेवलेली, शर्टात मागे लपवलेली हत्यारे बाहेर काढली जात असल्याने जनता त्यांना काही
न बोलता निमुटपणे चाललेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष्य करून मार्गस्थ होते. यात
विशेषतः दर्या बार समोरील आणि आजूबाजूचे मोठे मोकळे मैदान, रामनगर खानवस्ती
नदीच्या बाजूचा भाग, खान वस्ती पासून इंडस्ट्रीयल एरिया रस्ता आणि वनोद्यान
टेकडीचा मागील भाग, एनडीएचे मोकळे मैदान, वारजे स्मशानभूमी आणि पॉप्युलर प्रेस्टीज
ते स्मशानभूमी रस्ता, अतुलनगर रस्त्यावरील पार्किंग मधील वाहनांमध्ये दारू पीत
बसणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे, बारटक्के रुग्णालय आजूबाजूचा परिसर, म्हाडा कॉलनी
रस्ता आणि माझदा फार्म मैदान, रोझरी स्कूल ते हिल व्ह्यू सोसायटी - उरीट नगर - जलतरण
तलाव - शनी मारुती मंदिर - तिरुपती नगर पर्यंत टेकडीच्या बाजूचा रस्ता आणि
टेकडीवरील जंगलात शेकडोंच्या संख्येने दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
सिद्धेश्वर नगर टेकडीवरील खाणींचा भाग - जलशुद्धीकरण प्रकल्प, वारजे जलशुद्धीकरण
प्रकल्पाच्या चारही बाजूंनी तळीरामांचा अड्डा तयार झाला आहे. दुधाने लॉन्स रस्ता,
जावळकर उद्यान रस्ता, दत्त दिगंबर कॉलनी मागील मोकळे मैदान, कर्वेनगर पोलीस चौकी मागील
मोकळे मैदान, कर्वेनगर उड्डाणपुलाखाली या आणि अशा अनेक ठिकाणी उघड्यावर दारू
प्यायला बसणाऱ्या तळीरामांची संख्या वाढली आहे. हे कमी म्हणून कि काय, काही हॉटेल
मध्ये विनापरवाना दारू पिण्यास संमती दिली जाते आहे ते वेगळेच. त्यामुळे एवढ्या
प्रचंड मोठ्या क्षेत्रफळात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना “तोंड दाबून बुक्क्यांचा मार”
सहन करावा लागत आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित न झाला
तर नवल.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

